भावकीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार करत दोन सख्ख्या भावांचा खून

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील नागापूर खुर्द या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चुलत भावाने दोन सख्या भावांची हत्या केली आहे. कुऱ्हाडीने वार करत अत्यंत निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी चुलत भाऊ फरार झाला आहे.

काय आहे प्रकरण
बीडमधील नागापूर खूर्द या भागात राम सोळंके आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे भाऊ राहत होते. या दोन्ही भावांचे काही दिवसांपूर्वी त्यांचा चुलत भाऊ परमेश्वर सोळंके याच्याशी सुमारे 15-20 दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या वादातून मोठ्या प्रमाणात शिवीगाळसुद्धा करण्यात आली. त्यानंतर गावातील लोकांनी मध्यस्थी करत या सर्वांची समजूत काढत हा वाद मिटवला होता. वाद जरी मिटला असला तर मनात कुठेतरी राग होता. त्याच दरम्यान २ दिवसांपूर्वी परमेश्वर याने राम आणि लक्ष्मण यांना शिविगाळ केली होती. तसेच त्याने फोन करूनसुद्धा शिवीगाळ केली होती. यानंतर राम आणि लक्ष्मण सोळंके हे दोघे भाऊ त्याला समजावण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी त्याच्याकडे गेले होते. मात्र त्यावेळी परमेश्वर याचा रागाचा पारा चढला आणि त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि या भांडणात परमेश्वर याने या दोघांवर हल्ला केला.

परमेश्वर याने राम आणि लक्ष्मण दोघांवर धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करत त्यांची हत्या केली आहे. या दोघांपैकी एका भावाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर परमेश्वर फरार झाला आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी परमेश्वर सोळंके याला पकडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी पथक रवाना केले आहे. या दोन भावांच्या हत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like