गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरच आला आहे. बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग आदल्या दिवशीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने सार्‍यांची या असुराच्या त्रासातून सुटका केली. परंतू त्यामुळे त्याच्या अंगाची होणारी लाही कमी करण्यासाठी दुर्वांचा अभिषेक करून त्याला शांत करण्यात आले. म्हणूनच गणेशपूजनात प्रामुख्याने वापरली जाणारी दुर्वा आरोग्याच्या दृष्टीनेदेखील खूपच फायदेशीर आहे हे तुम्हांला माहित आहे का ? आज आपण जाणून घेऊया दुर्वांचे आरोग्यदायी फायदे..

रोगप्रतिकारशक्ती वाढते –

दुर्वा शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते. त्यामुळे अनेक आजारांपासून सक्षमपणे लढण्याची आपली क्षमता वाढते.

त्वचाविकार दूर होतात

आजकाल धुळ, माती, प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, आहारातील बदल यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होत असतो. जर तुम्हाला अंगावर पुरळ येत असेल, किंवा तुमच्या त्वचेचा दाह होत असेल तर तुम्ही दुर्वांचा वापर करू शकता. दुर्वांमध्ये अॅंटिसेप्टिक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. दुर्वांची पाने स्वच्छ करून त्याची वाटून पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या त्या भागावर लावा ज्यामुळे त्वचा विकार दूर होईल.

नाकातून रक्त येणे बंद होते-

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उष्णतेमुळे अनेकदा नाकातून रक्त येते. अश्या वेळी दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकामध्ये सोडल्याने नाकातून रक्त येणे बंद होते. तसेच तोंड आले असल्यास किंवा तोंडामध्ये फोड आले असल्यास दुर्वांचा रस पाण्यामध्ये मिसळून या पाण्याने चुळा भरल्याने आराम पडतो

पचनक्रिया सुधारते-

आजकाल बदललेलं जीवनमान आणि खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे पचनाचे विकार वाढले आहेत. मात्र, नियमित दुर्वांचा रस प्यायल्यास पचनमार्गाचे कार्य सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

डोकेदुखी दूर होते-

वाढलेला कामाचा ताण, अपुरी झोप, आणि रोजची धावपळ यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे जर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम हवा असेल तर दुर्वांची पाने वाटून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. शिवाय याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही.

दात आणि तोंडाचे आरोग्य –

दुर्वांमध्ये ‘फ्लॅवोनाईड्स’ या अतिशय पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे अल्सरचा त्रास होण्याचा धोका कमी होतो. हिरड्या सुधारतात याशिवाय तोंडाला येणारी दुर्गंधीसुद्धा कमी होण्यास मदत होते.