मुंबई । तब्बल दोन महिन्यानंतर आता मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बस सेवा सुरू होणार आहे. सोमवार पासून मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावणार असून या बसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं बोललं जात आहे.
राज्य सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करत राज्यातील अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनलॉक प्रक्रियेचा उद्या तिसरा टप्पा असून या टप्प्यात अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत बेस्ट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या नियमावलीनुसार बेस्ट बसमधून एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे एका बसमधून फक्त ३० प्रवासी प्रवास करू शकणार आहे. यापूर्वी बेस्ट बसमधून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, उद्या सोमवारपासून पाच प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावेळी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचं बंधन पाळणं आणि तोंडाला मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
बसमधून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा होती. आता मात्र इतरांनाही प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सरकारी कार्यालयातील १५ टक्के कर्मचारी, खासगी कार्यालयातील १० टक्के कर्मचारी, प्लंबर, पेस्ट कंट्रोल करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन आणि सरकारने मुभा दिलेल्या इतर व्यावसायिकांना या बसेसमधून उद्या प्रवास करता येणार आहे. उद्यापासून इतरांनाही बेस्ट सेवेचा लाभ घेता येणार असल्याने बेस्ट प्रशासनानेही उद्यापासून अधिकच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.