हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं त्यांनी म्हंटल. आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात कोश्यारी बोलत होते. राज्यपालांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहेत. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले.
राज्यपालांच्या विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही तर आहेतच पण शिवद्रोही सुद्धा आहेत. एकदा सह्याद्रीच्या पर्वतरांगातील गडकिल्ल्यांवर फिरा मग कळेल शिवाजी महाराज कोण होते …. उगीच उठायचं आणि टाळाला हे धंदे बंद करा असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने टीकेचे धनी बनतात. यापूर्वी देखील त्यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होत, तसेच सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्याबाबत बोलतानाही राज्यपालांची जीभ घसरली होती, त्यानंतर कोश्यारी नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. कोश्यारी यांना केंद्राने परत बोलवून घ्यावे अशी मागणीही विरोधकांनी यापूर्वी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.