उद्याच बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भगतसिंग कोशारी याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून उद्याच बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा असणार आहे.
ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार राज्याबाहेर असून सरकार अल्पमतात आहे. सदर आमदारांनी आमची काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडीची इच्छा नाही अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे लवकरच बहुमत चाचणी ठाकरे सरकारला घ्यायला सांगावी अशी मागणी देवेंद्र फडणीस यांनी काल रात्रीच राज्यपालांना केली होती. त्यानंतर आज लगेच राज्यपालांनी निर्देश देत सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे.
बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने उद्याचा दिवस महत्त्वाचा आणि निर्णायक ठरेल.