भगीरथ भालके राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत? पंढरपूरमध्ये तिरंगी लढत होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते आणि पक्षाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. त्यातच आता भगीरथ भालके यांच्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा यांनी विमान पाठवलं आणि भालके सुद्धा लगेच हेंद्राबादला गेल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे खरोखरच भगीरथ भालके राष्ट्रवादी सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. मात्र कार्यकर्ते म्हणतील तो आपला निर्णय असं म्हणत भालके यांनीही संपेन्स वाढवला आहे.

भगीरथ भालके यांनी हैद्राबादला जाऊन के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली मन कि बात बोलून दाखवली आहे. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजनांबद्दल माहिती दिली तशाच योजना महाराष्ट्रात व्हाव्यात अशी इच्छा आहे त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरायचं आहे. तुम्हीही आम्हाला साथ द्या अशी विनंती केसीआर यांनी केल्याची भगीरथ भालके यांनी सांगितलं . मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण याबाबत निर्णय घेणार आहोत, कार्यकर्ते जे म्हणतील तोच आपला निर्णय असेल. जनता हाच आमचा पक्ष आहे त्यामुळे काहीही करून २०२४ विधानसभा निवडणूक लढवणारच आहे असं भगीरथ भालके यांनी सांगितलं.

काय आहे पंढरपूरचे राजकारण –

२०१९ च्या निवडणुकीत भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके यांनी तिरंगी लढतीत बाजी मारत पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला, मात्र त्यानंतर आलेल्या कोरोना काळात भारत भालके यांच निधन झालं. भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भगीरथ भालके याना उमेदवारी दिली. मात्र महाविकास आघाडी एकत्रित असूनही समाधान अवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला. पराभवानंतर भगीरथ भालके पक्षात फारसे सक्रिय नव्हते. त्यातच भर म्हणजे मागील महिन्यात शरद पवार यांनी साखरसम्राट अभिजित पाटील याना पक्षात घेतलं आणि अभिजित पाटील हेच राष्ट्रवादीचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे जर भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत बीआरएस मध्ये प्रवेश केला तर पंढरपूरमध्ये भाजप- राष्ट्रवादी – बीआरएस असा तिरंगी सामना पाहायला मिळू शकतो.