भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिस स्टेशन अंतर्गत हि घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी साकोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि 363, तसेच पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. राजेश ईश्वर मडावी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने आरोपी राजेश अल्पवयीन मुलीला एसटी बसने साकोलीवरुन घेऊन गेला होता. रात्रीची वेळ असल्याने आणि बसमध्ये वाहक नसल्याची संधी साधून आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला.
काय आहे प्रकरण?
नागपूरला पोहोचल्यानंतर आरोपी राजेश तिला घेऊन आपल्या नातेवाईकांकडे गेला. मात्र त्याच्या नातेवाईकाला त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी राजेशला ताबडतोब घरुन निघून जाण्यास सांगितले. यानंतर नाईलाजाने आरोपी राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा या ठिकाणी परतला.
वडिलांची पोलिसात तक्रार
यादरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसांत आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरु केला असता बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता विद्यार्थिनी राजेश मडावीसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली.
विद्यार्थिनी आणि आरोपी ताब्यात
यानंतर पोलिसांनी तातडीने बोदरा गाव गाठून अल्पवयीन विद्यार्थिनी आणि राजेश मडावी यांना ताब्यात घेतले. यानंतर या दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या आधारावर पोलसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर कलम भादंवि 376, 363 आणि पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. साकोली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.