हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत राऊतांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला. यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांवर टीका करताना ‘भाडखाऊ’ शब्द वापरल्याने एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानामुळे व सत्ताधारी आमदारांच्या गदारोळामुळे तहकूब करण्यात आले. सभागृहात शिंदे गटाच्या व भाजपच्या आमदारांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका मांडली. “प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असतं. प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर अती तिथे माती हे ठरलेलं आहे.
हक्कभंग व्हायलाच पाहिजे. लोकांच्या भावना भडकत आहेत. बाहेर प्रक्षोभक वातावरण होऊ द्यायचं नसेल तर कारवाई झालीच पाहिजे. या माणसाला अधिकार कोणी दिला? हे स्वत:ला इतके शहाणे समजत आहेत? भाड खायला पाहिजे पण इतका भाडखाऊपणा नको. राऊत यांच्यावर कारवाई करा”, अशी मागणी गोगावले यांनी केली.
विधिमंडळात सभागृहाचे कामकाज सुरु असताना भरत गोगावले यांनी राऊतांवर कारवाईची मागणी करताना केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे सभागृह मात्र, तहकूब करण्यात आले. दरम्यान संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी मागे आली असताना आता भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा फॉर्मात आले आहे हे नक्की!
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे. हे बनावट चोरांचं मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने , बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदं गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे,” असं संजय राऊत यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हटले.