हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या मनोरा आमदार निवासाचे आज (गुरुवारी) भूमिपूजन झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थित आज ठीक दहा वाजता हा भूमिपूजन समारंभ पार पडला आहे. आता पुढच्या तीन वर्षात या आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मनोरा आमदार निवासमध्ये प्रत्येकी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन भव्य इमारतींसाठी ५.४ वाढीव FSR मंजूर करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आमदार निवासाचा खर्च तब्बल 400 कोटींनी वाढला आहे. या आमदार निवासात विधानसभेच्या २८८ तर विधान परिषदेच्या ७८ अशा एकूण ३६८ आमदारांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महत्वाचे म्हणजे, मनोरा आमदार निवासातील चार इमारतींची अवस्था कोसळण्या इतपत बिकट झाली होती. शेवटी या चारही इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात पुनर्बांधणीचे काम केंद्र सरकारच्या बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आले होते. त्याच्या पायाभरणीचा समारंभ देखील पार पडला होता. मात्र तेव्हा काम सुरू करण्यात आले नव्हते. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणे ऐवजी निविदा मागवून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्य म्हणजे, कोणत्या यंत्रणे कडून काम करून घ्यावे या मुद्द्यावरून आमदार निवासाचे बांधकाम गेल्या चार वर्षांपासून रखडले होते. यादरम्यान 853 कोटींच्या प्रकल्पाचे काम 1270 कोटींवर गेले. या प्रकल्पाला उशीर झाल्यामुळे या प्रकल्पाच्या निधीत 400 कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत झाले असते तर निधीत वाढ झाली नसती अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
10 am | 3-8-23📍Mumbai | स. १० वा | ३-८-२०२३📍मुंबई.
BhoomiPujan Ceremony of Manora MLA Hostel
मनोरा आमदार निवासचा भूमिपूजन सोहळा@rahulnarwekar @AjitPawarSpeaks @neelamgorhe #mlahostel #mumbai #maharashtra pic.twitter.com/IM3HvYlREA— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2023
आमदार निवासाच्या भव्य इमारतीत आमदारासाठी एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका पुरविली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम लार्सन अँड टुब्रो ही बांधकाम कंपनी करणार आहे. आमदार निवासाचा १३ हजार ४२९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांसाठी सर्व सोय पुरवली जाणार आहे. सभागृह, अतिथीगृह, ग्रंथालय, पुस्तकाचे दुकान, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सर्व गोष्टी आमदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.