नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारची निवड न झाल्याने क्रिकेटप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले होते. भुवनेश्वर कुमारने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसह आयपीएलमध्ये शानदार बॉलिंग केली आहे. त्याच्या या शानदार कामगिरी नंतर देखील निवड समितीने भुवनेश्वरला संधी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भुवनेश्वर कुमारने 2018 मध्ये भारताकडून शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. त्यानंतर तो वारंवार दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला टीममध्ये स्थान मिळाले नाही.
निवड समितीने भुवनेश्वरची निवड न करण्यामागे त्याचा फिटनेस हे कारण आहे असे सांगितले आहे. भारतीय टीम 4 महिन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दरम्यान भुवनेश्वर कुमार आपला फिटनेस टिकवू शकेल की नाही, याबाबत शंका आहे. यामुळे त्याची या संघात निवड करण्यात आली नाही. या दौऱ्यावर भुवनेश्वरच्या अनुपस्थित फास्ट बॉलर म्हणून मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना जागा मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला भुवनेश्वरची कसलीच कमतरता जाणवणार नाही.
भुवनेश्वर कुमारने 2013 मध्ये भारतीय टेस्ट टीममध्ये पदार्पण केले होते. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत तो फक्त 21 टेस्टच खेळला आहे. यामध्ये त्यांनी 26.09 च्या सरासरीने 63 विकेट घेतल्या आहेत. तसेच आगामी श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर कुमारला भारतीय टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या श्रीलंकेच्या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यामध्ये भुवनेश्वर कुमारला कर्णधार पद मिळण्याची शक्यता आहे.