हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनात अनेक लहान मुलांना आपले आईवडील गमवावे लागलेले आहेत. त्यांच्या जाण्याने अनेक मुलांवरील मायेचं जणू छत्रच हरवलं आहे. अशा मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या या महा भयंकर लाटेत आईवडिलांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्च्यात असलेल्या मुलांना संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार आहे याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या आईवडीलाच्या मुलांच्या संगोपन व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री ठाकूर यांनी दिली. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांची मोठी समस्या देशात निर्माण झाली आहे. अनेक अनाथ मुलांना त्यांचे शिक्षण तसेच इतर जबाबदारी पूर्ण क्षमतेने आम्ही पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कोरोना रोगाच्या अनुषंगाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बाळ न्याय समितीमार्फत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.