हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच झापले आहे. त्यामुळे आता नार्वेकर यांना येत्या 31 डिसेंबरच्या आत या प्रकरणाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
आज झालेल्या सुनावणीत “आम्ही मे महिन्यात निर्णय देऊन ही आतापर्यंत काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे आता सरन्यायाधीशांनीच याबाबत 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या” असे आदेश न्यायालयाने नार्वेकर यांना दिले. खरे तर, याप्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयांकडे आणखीन वेळ मागितला होता. दिवाळी, नाताळ आणि नागपूर अधिवेशन अशा अनेक कारणांमुळे तुषार मेहता यांनी वेळ वाढवून मागितली होती. मात्र आणखीन वेळ देण्यास न्यायालयाने आज नकार दिला आहे. त्यामुळे आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात याबाबत पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात आमदार अपात्रतेचा मुद्दा खोळंबला आहे. मात्र याबाबत निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून उशीर लावला जात आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नार्वेकर यांनी सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. मात्र या वेळापत्रकावर देखील ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यानंतर आज झालेल्या सुनावणीत न्यायलयाने देखील नार्वेकर यांना झापले आहे. त्यामुळे आता नार्वेकर या प्रकरणाची लवकर सुनावणी घेतील अशी शक्यता आहे.