योगी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला 3 महिन्यांची मुदतवाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मोफत रेशनला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय योगी सरकारने घेतला आहे. त्याचा थेट फायदा 15 कोटी जनतेला होणार असून जून 2022 पर्यंत हे मोफत रेशन मिळेल.

उत्तरप्रदेशात मोफत रेशन योजनेंतर्गत, लाभार्थी कुटुंबांना डाळी, साखर, खाद्यतेल, मीठ यांसारख्या मोफत अन्नपदार्थांसह 35 किलो रेशन घेण्याचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचा लाभ देण्यात येत होता. यानंतर योगी सरकारने ही योजना मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता यूपीच्या नवीन मंत्रिमंडळाने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजेच जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

निवडणुकीत गरिब परिवारांना भाजपने मदत केल्याचं म्हटलं आहे. करोनाकाळात पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक गरिबांना मोफक राशन देण्याची योजना जाहीर केली. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास १५ कोटी लोकांना राशन योजनेला लाभ मिळाला, असं मंत्रिमंडळा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.