हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. सामंतावरील हल्ल्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सामंमतांवरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
शिंदे समर्थक आ. सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यानंतर त्यांना आज पुणे कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यात शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात तसेच शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांचाही समावेश आहे. सामंत यांच्या गाडीवर झालेलया हल्ल्याचे पडसात आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले.
यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे कोणावरही हल्ले होऊ नयेत यासाठी आमदारांची सुरक्षा वाढविण्याची मागणी करण्यात आली. आमदारांच्या सुरक्षेच्या मुद्यांवर चर्चा पार पडल्यानंतर अखेर राज्य सरकारच्यावतीने शिंदे गटाच्या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.