हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सणासुदीचे दिवस असतानाच सर्वसामान्य लोकांना मात्र महागाईची झळ सोसावी लागत आहे. कारण मुंबईत दुधाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत 7 रुपयांनी वाढ होणार असून आता 1 लिटर दूध 80 रुपयांना मिळेल. 1 सप्टेंबर 2022 पासून नवी दरवाढ होईल.
जनावराच्या चाऱ्याचा वाढलेला खर्च, तसेच हरभरा सारख्या चाऱ्याचे वाढलेलं दर यांचा थेट फटका दूध उत्पादकांना बसताना दिसत आहे. त्यामुळेच दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती.
दरम्यान, दुधाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा इत्यादी फराळाच्या साहित्याचे दरही वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे यामध्ये वाढ झालेली आहे. या एकूण सर्व दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मात्र कात्री लागली हे मात्र नक्की…