Tuesday, June 6, 2023

नोरा फतेहीला मोठा दिलासा, सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटींच्या वसुली प्रकरणी ED ने केली साक्षीदार

दिल्ली । तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटी वसूली प्रकरणी ED च्या चौकशीतून चित्रपट अभिनेत्री नोरा फतेहीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी ED च्या आरोपपत्रात नोरा फतेहीला साक्षीदार करण्यात आले. त्याचबरोबर जॅकलीन फर्नांडिस अजूनही ED च्या रडारवर आहे. ED च्या मनी लाँड्रिंग आरोपपत्रात एकूण 178 साक्षीदार हजर करण्यात आले. ज्यामध्ये नोरा फतेहीच्या नावाचा साक्षी क्रमांक 45 म्हणून उल्लेख आहे.

त्याच वेळी, 44 क्रमांकावर साक्षी म्हणून जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टचे नाव देखील आहे. तर जॅकलिन फर्नांडिसला मात्र साक्षीदार करण्यात आलेले नाही. ED च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची भूमिका अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे. जॅकलिनचा त्रास सुरूच आहे. ED च्या आरोपपत्रात तिचा फिर्यादी साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही.

हे प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. चंद्रशेखरवर तिहार तुरुंगात असताना एका बड्या उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुकेशचे जॅकलिनसोबतचे कनेक्शन समोर आले आहे. सुकेश सांगतो की, त्याने अभिनेत्रीला अनेक आलिशान गिफ्ट्स दिल्या आहेत. त्यानंतर सुकेश आणि जॅकलीनचे काही फोटोही सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यामध्ये दोघांमधील जवळचे नाते दिसून येत होते.

सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांपर्यंतच्या गिफ्ट्स दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या पर्शियन मांजराचा समावेश आहे. सुकेशने नोरालाही गिफ्ट्स दिल्याचे वृत्त समोर आले आहे. सुकेशने नोराला आयफोन आणि बीएमडब्ल्यू कार भेट दिली. आता ED ची या दोन्ही अभिनेत्रींवर नजर आहे.