बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; ३ टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत”. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बिहारमधील मतदारांची संख्या ६.७ कोटीवरून ७.२ कोटीपर्यंत वाढली आहे. यामध्ये ३.७९ कोटी पुरुष आणि ३.३९ कोटी महिलांचा समावेश आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच कोरोनापासून सुरक्षेसाठी सहा लाख फेस शील्डचा वापर करण्यात येईल. कोरोना रुग्णांनाही या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.

बिहारची विधानसभा निवडणूक कशी पार पडणार?
* कोरोनाची लागण झालेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांना शेवटच्या एका तासात मतदान करता येईल. हे मतदान पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून पार पडेल.
* ८० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींनाही पोस्टल बॅलेटच्या माध्यमतून मतदान करण्याची मुभा.
* राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रत्यक्ष शक्य नसल्यास ऑनलाईन अर्जही भरता येणार. डिपॉझिटची रक्कमही ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची मुभा.
* राजकीय नेत्यांना निवडणूक अर्ज दाखल करताना आपल्यासोबत दोनच व्यक्तींना आणण्याची मुभा.
* मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ७ लाख सॅनिटायझर्स युनिट, ४६ लाख मास्क, सहा लाख पीपीई किट, ६.७ लाख फेस शिल्ड, २३ लाख हातमोजे आदी सामुग्रीची व्यवस्था.
* निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो करताना केवळ पाच गाड्यांना परवानगी. प्रचारावेळी सोशल डिस्टन्सिंगची पालन करण्याची सक्ती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment