खडसे, मुंडेंना भाजपचा पुन्हा दे धक्का! विधान परिषदेसाठी उभे केले ‘हे’ ४ उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई। येत्या २१ मे ला होऊ  घातलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळानुसार भाजपला चौथ्या जागेसाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या ओबीसी नैतृत्व एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने डावलले आहे.

भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.

या उमेदवारीनंतर भाजपात आता पुन्हा अंतर्गत धुसफूस पुढे येण्याची शक्यता आहे. कारण, विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच वरिष्ठांकडे इच्छा बोलून दाखवली होती. तर त्यांचं नाव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचंही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. एकनाथ खडसेंना विधानसभेतही तिकीट नाकारण्यात आलं होतं. आता पुन्हा विधानपरिषदेलाही त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल, असा अंदाज लावला जात होता.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे निवडणुकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या गोष्टीचे खंडन केलं होत. “कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहेत. माझ्या ई-मेल वरून माझ्या पीएने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला. त्यानंतर तो कोणीतरी व्हायरल केला. बातमी झाल्यावर मला याची कल्पना आली, स्पष्ट करत आहे,” असं ट्विट करुन पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”