हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला. मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. परिणामी सर्वसामान्य मराठा माणसासाठी विकासाचा मार्ग बंद झाला आणि तो रस्त्यावर आला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे अजित पवारांनी असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. समाजातील सामान्य माणसाच्या या विषयात भावना तीव्र आहेत, याची अजित पवार यांनी दखल घ्यावी आणि अशी कुचेष्टा करू नये असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.