हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा निमित्ताने रोखटोख भाषण करत हिंदुत्वावरून आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरून भाजपवर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरेंच्या या भाषणाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण होतं. काय ही भाषा. जरा तुमच्या भाषेचा विचार करा, असा टोला लगावतानाच या भाषणातून महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर काहीच बोलले नाही. भाषणात एकच मुद्दा होता तो म्हणजे भाजप, असा चिमटा पाटील यांनी काढला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली होती. त्याचाही पाटील यांनी समाचार घेतला. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला माहीत आहे. आम्ही काय आहोत हे तुम्हाला निवडणुकीतच दाखवून देऊ, असंही त्यांनी ठणकावले. हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही, असा इशाराही त्यांनी दिला
यापूर्वी भाजपच्या नारायण राणेंनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात ना शेतकऱ्याचा उल्लेख केला, ना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले. मुख्यमंत्र्यांना काय बोलावं कसं बोलावं हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायकच नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. करोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’