4 वेळा मुख्यमंत्री होऊनही पंतप्रधानपद न मिळाल्याची वेदना पवारांच्या मनात सलत आहे; फडणवीसांचा टोला

pawar fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी असुनही मुख्यमंत्रीच आहे असं वाटतंय अस विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. त्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा पलटवार करत पवारांवर निशाणा साधला. 4 वेळा मुख्यमंत्री होऊनही पंतप्रधानपद न मिळाल्याची वेदना पवारांच्या मनात सलत आहे अशी टीका फडणवीस यांनी केली.

शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही याची वेदना सलत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी याबाबत भाष्य केले. “शरद पवार मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, 4 वेळा मुख्यमंत्री राहूनही त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही त्यांची वेदना त्यांच्या मनात सलत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला.

राज्यात आम्हाला सत्ता मिळाली नाही ही गोष्ट खरी आहे. पण त्यामुळे आम्ही हातपाय गाळले नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आमची कामगिरी उत्तम आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला आहे. पूर, वादळात आम्ही राज्यभर फिरलो. कोविड काळात लोकांची सेवा केली. घरात बसून राहिलो नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सणसणीत टोला लगावला.