हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे.
स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. स्वप्नीलप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट पाहत आहे का?, असा सवाल पडळकर यांनी केला. येत्या आठ दिवसात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देतानाच सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थांना तातडीने नियुक्ती द्यावी, ‘अशी मागणीही त्यांनी केली.
स्वप्नीलचा आत्महत्या म्हणजे ठाकरे सरकारने केलेला मर्डर- राणे
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेनंतर सरकारवर गंभीर आरोप केला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने केलेली ही मर्डर आहे. हे सरकार स्वतःच्या मस्तीत असल्यामुळे त्यांचे महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नाही. एमपीएससी हा विषय इतक्या वेळा ऐरणीवर येऊन सुद्धा राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.