संजय राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालंय; पडळकरांची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजपने या निर्णयावरून सरकार वर ताशेरे ओढल्या नंतर शिवसेनेनं सामनातून भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेत थेट संजय राऊतांवर हल्लाबोल केला. संजय राऊतांचे झिंग झिंग झिंगाट’ झालंय अशी बोचरी टीका पडळकरांनी केली आहे.

जनाब संजय राऊत हे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’  झालंय. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले.

जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. टक्केवारी साठी वाईन म्हणजे दारू नाही असे म्हणणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो अस पडळकर म्हणाले.

शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत असे पडळकरांनी म्हंटल.