हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी थेट पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. हिंमत असेल तर समोर येऊ लढा अस खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलं. तसेच महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठीच भाजप अस काम करत आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
दरम्यान संजय राऊतांच्या या आरोपाला भाजप कडून प्रत्युत्तर आलं आहे. संजय राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे, यादी असेल तर त्यांनी थेट ईडीला द्यावी. पत्रकार परिषदेत तोंडाच्या वाफा कशाला दवडता, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
संजय राऊत सकाळपर्यंत ईडीची नोटीस आलीच नसल्याचं सांगत होते. आता नोटीस आल्याचं सांगत आहेत. दोन तासांत त्यांचा सूर बदलला आहे, असं सांगतानाच राऊतांकडे 120 नव्हे 240 जणांची यादी असेल तर त्यांनी ती ईडीला द्यावी. ईडीला ही यादी देऊन कारवाईची मागणी करावी, तोंडाची वाफ कशाला दवडता? असा सवाल उपाध्ये यांनी केला. तुम्ही जर लाभार्थी नसाल तर ईडीला तशी माहिती द्या. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाका, असा सल्लाही त्यांनी दिला.
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत –
आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात. असा आरोप राऊतांनी केला. तुम्ही नोटीस पाठवा नाहितर आम्हाला घरी येऊन अटक करुन घेऊन जा. आम्ही घाबरत नाही. मात्र हे बायकांच्या पदराआडून केलेली खेळी तुमच्यावर पलटल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाना साधलाय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’




