हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर अतिवृष्टीवरून व नुकसान भरपाईवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?, असा सवाल मंत्री राणेंनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकारकडून साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यात आलेला नाही. याउलट केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मंत्री राणे म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी आहेत. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.