हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. अशात शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या आरोग्याचा तसेच येथील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवावी,”अशी मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची गरज पाहता व सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील 38 प्राथमिक केंद्राना रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांचा रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रस्ताव अजूनही प्रलंबितच आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने 13 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त अखर्चित निधी तसेच 14 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची रक्कम रुपये 89 लाख 91 हजार 951 रुपये इतकी रक्कम शासन आदेशान्वये राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांचे खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. या संदर्भात जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी आपल्या विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मंत्री राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.