हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या १२७ व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या संसदेतील चर्चेवेळी भाजपच्या एकाही खासदाराने भूमिका मांडली नाही. यावरून काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली होती. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगावे,” असे आव्हान पाटील यांनी चव्हाण यांना दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारच्यावतीने ज्यावेळी मराठा आरक्षणाची आली. त्यावेळी ती व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण नामंजूर करण्यात आले. या आरक्षणासाठी गठीत केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेकवेळा आरक्षणाबाबत नवनवीन मुद्दे मांडण्याचे काम केले. आता घटनादुरुस्तीनंतर राज्याला पूर्ण अधिकार मिळाल्यानंतर ते पन्नास टक्क्यांच्या मुद्द्यावर अडून बसलेले आहेत. मात्र, तुमच्या सरकारला मराठा समाजाला खरोखरीच आरक्षण द्यायचे आहे का नाही, ते चव्हाण यांनी सांगून टाकावे.
लोकसभेत घटना दुरुस्तीचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याबाबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली होती. एकाही भाजपच्या खासदाराने आवाज उठवला नाही. आज त्यांना याबाबत बोलण्याची संधी होती परंतु ती संधी देखील खासदारांनी गमावली असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले होते. यावरून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.