अहमदनगर । गेले काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेमध्ये मेगाभरती होणार असल्याची विधान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहेत. भाजपचे दिग्गज एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला खिंडार पडल्यानंतर राष्ट्रवादी त्यांना आणखी काही धक्के देण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. किमान तशी वातावरण निर्मिती करत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
”आघाडी सरकार उत्तम चालले आहे. मग का आमच्या लोकांना आकर्षित का करता? तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील यांनी गुरुवारी (दि. १७) सायंकाळी साई दरबारी हजेरी लावली. आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, अजितदादा खूप चांगले नेते आहेत, चांगले काम करतात. पण, अजित पवारांमध्ये ताकद असती तर ८० तासांचे सरकार त्यांना टिकविता आले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर पाटील म्हणाले, एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का? यांना निवडणूक आयोग, कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का, असा सवालही पाटील यांनी केला. आम्हीसुद्धा ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना सोबत नसल्याने आमचे नुकसान होते. मात्र, शिवसेना सत्तेत असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. आम्हाला काय फरक पडत नाही. मात्र, शिवसेना संपत चाललीय, अशी टीकाही त्यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’