मुंबई । कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला. तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना काढला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील बोलत होते.
हे सरकार मुंबईबाबत एकही धड निर्णय घेत नाही. केवळ मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आजार राहिला बाजूला मुंबईकर वैतागले आहेत. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात आम्हाला सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही, अशी टीका चंद्रकांतदादांनी केली.
सरकारला नक्की काय करायचं आहे. लॉकडाऊन कडक करायचा आहे की अनलॉक करायचं आहे? एकीकडे अनलॉक सुरू करत आहोत सांगितलं जात आहे. दुसरीकडे कडक निर्बंध लादले जात आहेत. नक्की काय चालू आहे हेच कळत नाही. लॉकडाऊनपेक्षा सरकारच्या अनलॉकमध्ये अधिक गोंधळ आहे. त्यामुळे नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल पाटील यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”