केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर ठाकरे सरकारने एकतर्फी निर्णय घेतले- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर राज्य सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय घेत होतं अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांसी बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि, “सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने जी याचिका केली होती ती फेटाळली आहे. परीक्षेशिवाय पदवी देऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. देशभरातील कुलगुरुंचंही हेच मत होतं. जी कमिटी तयार करण्यात आली होती त्यांनीही हाच रिपोर्ट दिला होता. तरीही केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं. त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “आज परीक्षा नाही याचा कदाचित काही लोकांना आनंद झाला असता पण भविष्यात त्यांची पदवी काही कामाची राहिली नसती. सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला असल्याने विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, तोटा होणार नाही. त्यांच्या पदवीला मूल्य असेल. मूल्य नसणारी पदवी त्यांना प्राप्त करावी लागणार नाही”.

तत्पूर्वी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना यूजीसीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केले. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करु शकतात असे न्यायालयाने सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”