मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्यातील साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकीनंतर प्रत्युत्तर दिलं आहे
फडणवीस म्हणाले,”त्या मुलाखतीमध्ये विद्वान संपादक. आमचं पटत नसलं, तरी ते विद्वान आहेत हे मी मानतो. ते राज्य सभेचे सदस्यही आहेत. ते मुख्यमंत्र्यांना विचारतात की, मी साखर उद्योगाचे प्रश्न घेऊन अमित शाह यांना कशासाठी भेटलो. आता यांना इतकंही माहिती नाही की, साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला, त्याचे अध्यक्ष अमित शाह हे आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. शरद पवार यांनी सुद्धा साखर उद्योगासंबंधात पत्र लिहिली आहेत, ती काही आदेश बांदेकरांना नाही लिहिलेली. ती त्यांनी अमित शाह यांनाच लिहिली आहेत. आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल, तर शेतकऱ्यांचे काय होणार,” असा उपरोधिक सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी टोला लगावला.
नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्रासाठी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राऊत यांनी देवेद्रे फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यासंबंधी उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना “देवेंद्र फडणवीस यांना आदेश बांदेकर जसा होम मिनिस्टर कार्यक्रम करतात, तसे गृहमंत्री अमित शहा त्यांना वाटले होम मिनिस्टर,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना चिमटा काढला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”