व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, आम्ही सदैव आपल्या सोबत’; भाजपचे चिन्ह हटवत खडसे समर्थकांची तूफान बॅनरबाजी

जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वांच्या नजरा खडसे कोणता निर्णय घेतात याकडे लागले आहे. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर आता एक पाऊल पुढे टाकत, भाजपचे चिन्ह हटवत, ‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण’ अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोरात होऊ लागल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासाठी 17 ऑक्टोबरचा मुहूर्त मानला जात होता. मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेचा मुहूर्त असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनी मात्र या सर्व विषयावर मौन बाळगले आहे. कोणताही निर्णय झाल्यास तो आपण स्वतः कळवू असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र खडसे मुंबईत जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा प्रकारच्या शक्यता पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे चिन्ह हटवत खडसे यांचे बॅनर आपल्या वाहनावर आणि रस्त्याच्या कडेला उभे केले आहेत. ‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’, ‘भाऊ आम्ही सदैव आपल्या सोबत’ असं मुक्ताईनगर तालुक्यातील पूरनाड गावातील एका बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. काहीशा अशाचं  आशयाचे बॅनर खडसेंचा बालेकिल्ला मुक्ताईनगर आणि जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. समर्थकांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

काही दिवसांपूर्वी खडसेंना पक्षांतराबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं होतं की, ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स’. ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत’, असेही त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”