महाविकास आघाडी सरकार हे काळ्या पायाचे ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी आक्रमक पावित्रा घेत संप केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे नेत्यांनी पाठींबा दिला असून आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे काळ्या पायाचे आहे. हे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर सातव्या दिवशीही आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्यावतीने महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, काळ्या पायाचे हे आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब लोकांवर अनेक संकटे आली. तेव्हा त्यांच्या संकटाच्या काळात या सरकारने काहीच मदत केली नाही. सरकारने जर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या नाहीत आणि त्यांच्याशी चर्चा केली नाही तर हेच एसटी कर्मचारी तुमचे दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत,असे पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांनी यावेळी पर्यावरणमंत्री तथा परिवहन खात्याचे सचिव आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महामंडळाचे सचिव असलेले आदित्य ठाकरे हे परदेशात जातातच कसे? गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात. त्यांची चौकशी झाली पाहिजे. ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार असल्याचेही पडळकर म्हणाले.

Leave a Comment