मोफत लसीची घोषणा हे लबाडा घरचे आवताण; भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सद्ध्या करोनाने हाहाकार माजवला आहे. केंद्र सरकारने 18-44 वयोगटातील जनतेला 1 मे पासून लस देण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने या गटातील जनतेला लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील जनतेला मोफत लस देण्याची ठाकरे सरकारची घोषणा म्हणजे लबाडा घरचे आवताण असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर भातखळकरांनी ठाकरे सरकारला मोफत लसीच्या मुद्यावरून लक्ष्य केले. ठाकरे सरकारने मोफत लसीची घोषणा केली असली तरी खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस विकतच मिळणार आहे असे ते म्हणाले. केंद्राकडून लस मिळत नसल्याचे तुणतुणे राज्य सरकारने जारी ठेवले आहे. लस मिळत नसल्याने मोफत लस देता येत नाही असे रडगाणे गाण्यापेक्षा खुल्या बाजारातून ठाकरे सरकार येत्या १५-२० दिवसांत किती लसी विकत घेऊन जनतेला मोफत देणार आहे हे त्यांनी आधी जाहीर करावे असे आवाहन त्यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना राज्यसरकारला दिले.

केंद्र सरकारने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के लस विकण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे राज्य सरकारला लस विकत घेण्यात काही अडचण येऊ नये. त्यामुळे ठाकरे सरकारची घोषणा ही सवंग लोकप्रियतेसाठी नसून लोकांच्या भल्यासाठी आहे असा संदेशही लोकांपर्यंत जाईल असे भातखळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, कच्चा माल मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे लस निर्मितीला अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे ठरलेल्या वेळेत लसीकरण कसे पूर्ण होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

Leave a Comment