हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही परवानगी दिली नाही. म्हणून परवानगी साठी नारायण राणे सातत्याने मातोश्रीवर फोन करत होते असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला होता. यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा त्यांनी केला.
नारायण राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
नक्की काय म्हणाले होते विनायक राऊत?
नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून करा असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’