हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत, असे म्हंटले होते. राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते नितेश राणे यांनी घेतला आहे. सध्या पळून गेलेले परमबीर सिंग हे जास्त करून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच जवळचे होते. त्यामुळे याआधी त्यांची चौकशी करावी. त्यांना विचारावे. त्यांना माहिती असेल, असा आरोप राणे यांनी केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या चौकशीला हजर झाले. त्यावेळी त्यांनी माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत? असा सवाल केला होता. परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध हे जगजाहीर आहेत. पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही तपासा. पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते. परमबीर सिंग त्यांच्या जवळ होते मग त्यांनाच विचारले पाहिजे ना का पळाले आणि कुठे गेले आहेत?
पळून गेलेल्या परमबीर सिंग यांच्याकडे फक्त अनिल देशमुखांचीच माहिती नाही तर सुशांत सिंह राजपूतचे काय झाले? दिशा सालियानचे काय झाले? ही सर्व माहिती सुद्धा त्यांच्याकडे आहे. दिशा सालियानच्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज गायब झाली. या सर्व माहितीचा परमबीर सिंग यांच्याकडे पण असल्याचे राणे यांनी सांगितले.