हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. याला प्रत्युत्तर देताना ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. “वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि 12 आमदारांच्या निवडीचा संबंध काय? अजित पवारांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
फडणवीसांनी देखील घेतला समाचार –
दरम्यान, 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’