हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकावर केंद्रातील भाजप नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जाते. दरम्यान, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे. राज्यात पोलिसच बॉम्ब पेरत असून सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत जावडेकर यांनी टीका केली आहे.
माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नाशिक येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाने सुशासन दिन सोहळ्यास उपथिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी रचलेल्या पायावर केंद्रातील मोदी सरकारचे काम सुरू आहे. हे सुशासन आहे. महाराष्ट्रात मात्र वेगळी परिस्थिती पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दुशासन आणि कुशासन कार्यरत आहे.
नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे पोलिसांच्या शिरावर असते. ते बॉम्ब पेरणाऱ्या दहशतवाद्यांना बेड्या ठोकतात. मात्र, राज्यात पोलिसच बॉम्ब पेरण्यात गुंतले आहेत. त्यांनीच खून केले आहेत. स्वतःवरील खटल्यावरून लक्ष हटवण्यासाठी मंत्री गुंतले आहेत. हे कुशासन आहे. सातपूरचे भाजप मंडलाध्यक्ष इघे यांचा राजकीय खून झाला. भाजपला कोणत्याही मार्गाने रोखता येत नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना असे संपवले जात आहे. याप्रकरणामागे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी जावडेकर यांनी केली.