हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या पोट निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पहायला मिळाले. दरम्यान आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकार घणाघाती टीका केली आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या आघाडीचा शिवसेनेला पश्चात्ताप होणार आहे. शिवसेनेने आघाडी सोबत जाणे म्हणजे राजकीय आत्महत्याच होय,” असे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मोठा आणि सत्ता असलेल्या शिवसेना पक्षाची नुकत्याच झालेल्या पोट निवडणूक निकालात पिछाडी म्हणजे असंगाशी संग केल्याचे भोग म्हणावे लागेल.
काही वर्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत केलेल्या आघाडीचा शिवसेनेला पश्चात्ताप होणार हे नक्की. ज्या शिवसेनेने आजवर वैचारिक पाया जोपासण्याचे काम केले आहे. तो वैचारिक पाया नष्ट करण्याचे काम आघाडीतील घटक पक्ष करत आहेत. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची विधाने म्हणजे केवळ खुर्चीसाठीचे एकत्रीकरण असल्याची टीका यावेळी मुनगंटीवार यांनी केली आहे.