पुणे । भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळला आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्यावर भाजपमधून कोणी जातं का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी यावेळी विचारला.
भाजपच्या १०५ आमदारांपैकी ८० जणांनी तिकडे जातील, ही सोप्पी गोष्ट वाटते का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवार व महाविकासआघाडी त्यांच्या आमदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की, आपले आमदार जात नाहीत आम्हीच त्यांचे आणतो आहेत, असं पाटील यावेळी म्हणाले.
राजकारणात अनेकांचे जुने संबंध असतात. काही आमदारांच्या कामानिमित्त भेटी होत असतात. त्यानुसार काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असतील. त्यावरुन भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत जाणार असे बोलले जात आहे. मात्र भाजपाचे कोणीही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाहीत असं पाटील यांनी आज स्पष्ट केले आहे.
याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामंही होत नाहीत, अशी टीका पाटील यांनी यावेळी केली. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले असा होत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”