हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साकीनका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर यावर आता भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढीच विचारणा आहे की, मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावणारे धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांताचे आहेत. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली जात आहे. त्यांच्या घरात छापेमारी करण्यात येते. संजय राठोड प्रकरणाचं काय झाले? त्या मुलीला गर्भपात करावा लागला असून त्या घटनेला ६ महिन्यांचा कालावधी उलटून गेले आहेत. त्याचा रिपोर्ट येत नाही. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेचे अपयश लपवण्यासाठी दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री हे प्रांतवादाचा सहारा घेत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
या प्रकरणातील लढाई पुढेही १०० टक्के सुरु राहील. पोलिसांना सांगितले आहे की, ४ दिवसांत याबाबत लेखी उत्तर मिळालं पाहिजे की तुम्ही माझ्या तक्रारीवर काय करत आहात? या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले.