भाजपचे ७ आमदार अजित पवारांच्या संपर्कात  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी : सत्तासमीरणात काय घडेल याचा नेम नसतो याचाच प्रत्यय देणारी माहिती आता समोर येत आहे. राज्यात सत्तास्थापनेस असमर्थ ठरल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपच्या ७ आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी २ आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून मोठा संघर्ष निर्माण झाला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मात्र सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे मग निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रित म्हणजे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरू केल्याची माहिती आहे.