हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची तसेच मंत्र्यांची ईडीतर्फे चौकशी सुरु आहे. यावरून भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर नेत्यांवरील कारवाईसाठी केला जात आहे असा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केला जात असताना भाजपच्या एका आमदाराला औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. भाजप नेते आणि बीड जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबात अधिक माहिती अशी की, भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आठ महिन्यांपूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता. या दाखल झालेल्या गुन्ह्यात 395 कलम वाढवण्याचा आदेश नुकताच देण्यात आला. या आदेशाने धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती.