Friday, June 2, 2023

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भातीलही व्यथा जाणून घ्याव्यात – नवनीत राणा यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी मुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले आहेत. त्यामुळे गावगावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे, घरांचेही नुकसान झाले आहे. या ठिकाणची आज भाजपच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. पंढरपूरला गाडी चालवत जाणार्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भातील जनतेच्या व्यथा जाणून घ्याव्यात, असे राणा यांनी म्हंटले.

अमरावती जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या प्रवीण आणि अनिल गुडधे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.  यावेळी खासदार नवनीत रवी राणा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री स्वतः वाहन चालवीत पंढरपूरला जाऊ शकतात, त्यांना वाहन चालविण्याचा छंद असून त्या निमित्ताने का होईना त्यांनी या कठीण परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी वाहन चालवीत अमरावतीत यावे. ते शक्य नसेल तर विमानाने यावे. पण आता मातोश्रीबाहेर पडून जिल्ह्यातील हवालदिल, त्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असा टोलाही राणा यांनी लगावला.

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी नवनीत राणा यांनी घडलेल्या घटनांची व नुकसानीची शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी-गावकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असे राणा यांनी अधिकार्याना निर्देश दिले. मदतकार्यात किंवा नुकसानभरपाईच्या कामात दिरंगाई करण्याऱ्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असा इशाराही यावेळी खासदार राणा यांनी दिला.