हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आगामी 2024 विधानसभा निवडणूक कुडाळ मालवण मतदारसंघातून लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. कुडाळ शहरातील महालक्ष्मी हॉल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. निलेश राणे यांनी ही घोषणा करताच सभागृहातील भाजप कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून व घोषणाबाजी केली.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी मला सिंधुदुर्गात जोमाने काम करायला सांगितले आहे. त्यानुसार मी काम करत आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा बँक या सगळ्या निवडणुका आपल्याला एकहाती भाजपच्या चिन्हावर जिंकायच्या आहेत. त्यानंतर २०२४ मध्ये मलाही येथून जिंकायचे आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे असे निलेश राणे यांनी म्हंटल.
गद्दारी खपवून घेतली जाणार नाही- नारायण राणे
निलेश राणेंच्या या घोषणेनंतर नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना गद्दारी चालणार नाही, असा दम भरला आहे. आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही. येणा-या निवडणुकीत गद्दारी अजिबात सहन करणार नाही. माझ्या निवडणूकीत जे झाल ते मी सहन केलं. मात्र, पुढच्या निवडणुकीत कोणी गद्दारी केली तर खपवून घेणार नाही. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच पण दुसरं काय करायला लावू नका, असा सज्जड दम नारायण राणे यांनी कार्यकर्त्याना दिला आहे.