ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी विरोधात जिल्हाभर भाजप आंदोलन करणार : जयकुमार गोरे यांची घोषणा

Jayakumar Gore Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नाहीत. मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप राज्यभर, जिल्हाभर आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

आ. जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हणाले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल.

सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत , इंजिनीअर आहेत , व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकातुन म्हंटले आहे.