मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले; एकनाथ खडसेंची घणाघाती टीका

जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर नाव घेऊन हल्ला चढवला आहे. मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मराठवाडा, कोकणातून प्रत्येकी तीन मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. खडसे पुढे म्हणालेत, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्राय क्लिनर होते. आरोप झालेल्या प्रत्येकाला त्यांनी क्लीन चिट दिली. पण नाथाभाऊला मात्र त्यांनी क्लीन चीट दिली नाही, अशी व्यथाही खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली.

नाथाभाऊ पक्ष का सोडत नाही, असे कार्यकर्ते विचारतात. नाथाभाऊने काही काळबेरं केलं म्हणून नाथाभाऊ पक्ष सोडत नाही का, असं काहीही नसून अनेक पक्षातून आजही ऑफर आहे. महाराष्ट्रातील जनतेला विचारून लवकरच निर्णय घेईल, असा थेट इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे. दरम्यान, मला जो त्रास झाला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो. मला उध्वस्त करण्याचे काम केले. मला पक्षाचा कधी विरोध झाला नाही तर व्यक्तीने केला. माझी ताकद माझा कार्यकर्ता, माझी जनता, असे सांगत नव्या वाटचालीबाबत सांगताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी खडसे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली? मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशी टीका केली होती. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले होते.

‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता’, असा दावा खडसे यांनी केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like