मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेना युतीच्या बैठक युद्ध पातळीवर होत असून भाजप आणि शिवसेना युती कोणत्याही परिस्थितीत करायचीच असा निर्धारच दोन्ही पक्षांनी केला आहे. शिवसेना देखील वाटाघाटीच्या मुद्द्यांवर नरमली असून आता फक्त सहा जागांवर भाजप शिवसेनेचा युतीचा तोडगा बाकी असल्याची चर्चा आहे.
औसा – लातूर जिल्हा, वडाळा- मुंबई, एरोली – ठाणे, बेलापूर – ठाणे, उल्हासनगर – ठाणे या पाच जागांवर शिवसेना आडून बसल्याने युतीची बोलणी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. औसा आणि बेलापूर मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना आपल्या दोन्ही स्विस सहाय्यकांना भाजपची उमेदवारी देऊन विधानसभेत पाठवायचे आहे. त्यामुळे ते खासकरून या दोन जागांची मागणी करत आहेत. तर शिवसेनेने देखील बेलापूर मतदारसंघात खास तयारी केली आहे. त्यामुळे सेना भाजप या पेचातून कसा मार्ग काढणार हे बघण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान येत्या ४८ तासात युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच कोणत्या जागी कोण लढणार हे देखील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीची घोषणा कधी केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.