हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना उमेदवारी द्यावी अस म्हणत गुगली टाकली आहे. राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी अस संजय राऊत म्हणाले. राऊत सध्या अयोध्येला असून यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत मांडले.
संजय राऊत म्हणाले, शरद पवार या देशातील सर्वात अनुभवी नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग देशात आहे. या देशाला एखाद्या नेत्याच्या अनुभवाचा लाभ होईल, असं जर कोणी नेता असेल तर ते शरद पवारच आहेत. पण राज्यकर्त्यांचे मन त्यासाठी मोठं असावं लागतं.मन मोठं असेल तरच राज्यकर्ते अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून आपण उमेदवारी घेणार नाही त्यामुळे मला कोणी गृहीत धरू नका अस म्हणत शरद पवार यांनी यापूर्वीच या शक्यतेला पूर्णविराम दिला आहे. देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून 21 जुलै ला मतमोजणी पार पडेल.