हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नी राज्य सरकारविरोधात रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच “राजेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही,” असे म्हंटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आता संभाजीराजेंनी या चळवळीचे नेतृत्व केले पाहिजे. कारण सर्वांना संभाजीराजेंकडून फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कुणी तरी नेतृत्व देण्याची गरज आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले त्या वेळीही सर्व संघटना रणांगणात उतरल्या होत्या. मराठा आंदोलनात भाजप उतरली. पण भाजप राजकीय पक्ष असल्याने त्याला राजकीय रंग दिला गेला.
आता संभाजी राजे हे पक्षांच्या वर आहेत. त्यांनी नेतृत्व केले तर या चळवळीला बळ येईल. हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. संभाजी राजेंनी हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे संभाजीराजेंनी आता सरकारचे नाक दाबून तोंड उघडावे, असेही पाटील यांनी यावेळी म्हंटले आहे.




